Last Updated:
अमरावती जिल्ह्यांतील काही शेतकरी आपल्या शेतात कोंबडी खताचा वापर करतात. त्यातून त्यांना चांगला फायदा मिळत आहे.
अमरावती: जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्याने पेरणी करायला सुरुवात केली. त्याआधीही काही शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे. पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्याला पीक हे स्वतःच्या मुलांप्रमाणे जपावे लागते. त्यासाठी शेतकरी जीवाचे रान करतो. पण, काही वेळा वर्षभर खत पाणी घालून शेतकऱ्याच्या पदरी शेवटी निराशाच येते. त्यामुळे पिकांना योग्य खत आणि फवारणी देणे गरजेचे आहे. अमरावती जिल्ह्यातील काही शेतकरी आपल्या शेतात कोंबडी खताचा वापर करतात. त्यातून त्यांना चांगला फायदा मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील शेतकरी रविंद्र मेटकर हे त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्याकडे पोल्ट्री फार्म असल्यामुळे ते त्यांच्या शेतात कोंबडी खत वापरतात. विषमुक्त अन्न तयार व्हावे म्हणून त्यांनी शेतात फवारणीसाठी पंचामृत तयार केले. त्याचबरोबर खत म्हणून ते कोंबडी खताचा वापर करतात. लोकल 18 शी बोलताना ते सांगतात की, कोंबडी खतामध्ये शेतीला पुरक असणारे सर्वच घटक आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केल्यापेक्षा कोंबडी खत शेतात वापरलेले केव्हाही चांगले असेल.
कोंबडी खतात कोणकोणते घटक असतात?
पुढे ते सांगतात की, कोंबडीच्या खतामध्ये द्रव आणि घनस्वरूपातील पदार्थ एकरूप साठलेले असल्यामुळे कोंबडीच्या खताचा नाश होत नाही. म्हणून हे एक उत्तम सेंद्रिय खत आहे. त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सोडियम, फेरस, मंगल, मॉलिब्डेनम, बोरान, झिंक, कॉपर हे सर्व घटक आढळून येतात. त्यामुळे शेतातील पिके लवकर वाढ घेतात. उत्पादनात काहीशी वाढ होते. त्याचबरोबर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव फार कमी होतो, असेही ते सांगतात.
कोंबडी खताचा भाव किती?
कोंबडी खत इतर खताच्या तुलनेत किमतीने देखील स्वस्त आहे. 1200 रुपये टन अशी कोंबडी खताची किंमत आहे. त्यामुळे हे खत गुणकारी असण्याबरोबरच परवडण्यासारखे देखील आहे. पिकांना जमिनीतून हे खत आपण देतो. त्यातून कोणताही बीजप्रसार होत नाही. शेणखत किंवा आणखी काही वापरल्यास शेतात तणाचे प्रमाण वाढते आणि मग खर्चही वाढतो. मात्र, कोंबडी खत वापरल्यास अशी कोणतीही समस्या उद्भवत नाही. कोंबडी खत हे अंडी देणाऱ्या कोंबडीचे असल्यास त्याचा फायदा शेतीला जास्त होतो. त्यामुळे शक्यतोवर शेतकऱ्यांनी शेतात अंडी देणाऱ्या कोंबडीचे खत वापरण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
Amravati,Amravati,Maharashtra
June 10, 2025 9:29 AM IST
Poultry Manure: शेतकऱ्यांनो, रासायनिक खता पेक्षा भारीच, शेतात कोंबडी खत वापरण्याचे फायदे माहितीये का?