1) माती परीक्षण करा
खते देण्याआधी माती परीक्षण करून तिच्या पोषणमूल्यांची माहिती घेणे फार गरजेचे आहे. यामुळे मातीतील नत्र (N), स्फुरद (P), आणि पालाश (K) यांच्या प्रमाणाचा अंदाज येतो आणि त्यानुसारच योग्य प्रमाणात खतांचा बेसल डोस ठरवता येतो. ही माहिती नसल्यास अंधाधुंद खतांचा वापर होतो, जे नुकसानदायक ठरू शकते.
2) बेसल डोस म्हणजे काय?
बेसल डोस म्हणजे बियाणे पेरणीच्या वेळी शेतात दिले जाणारे प्राथमिक रासायनिक खते. यामध्ये मुख्यतः नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) यांचा समावेश असतो. काही वेळा गंधक, झिंक किंवा सूक्ष्मअन्नद्रव्येही यामध्ये समाविष्ट केली जातात, विशेषतः जर माती परीक्षणात त्यांची कमतरता आढळली असेल तर.
3) योग्य प्रमाण आणि खतांचे प्रकार
उदा. सोयाबीनसाठी बेसल डोस
युरिया (नत्र) – 50 किग्रॅ/हेक्टरी
सिंगल सुपर फॉस्फेट (स्फुरद) – 200 किग्रॅ/हेक्टरी.
म्युरिएट ऑफ पोटॅश (पालाश) – 50 किग्रॅ/हेक्टरी.
विविध पिकांसाठी बेसल डोस वेगळा असतो.त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.
4)खत टाकण्याची योग्य पद्धत
खत बियाण्यांच्या रांगेत न देता त्याच्या बाजूला व थोडे खाली टाकावे. यामुळे अंकुरांना खतांचा थेट परिणाम होतो व मूळजाळे व्यवस्थित तयार होते. यासाठी फर्टी ड्रिल, सिड कम फर्टिलायझर ड्रिल किंवा डिबलिंग पद्धत वापरणे उपयुक्त ठरते. ओलाव्याच्या स्थितीनुसार खत पसरवावे. कोरड्या जमिनीत खत दिल्यास त्याचा अपव्यय होण्याची शक्यता असते.
5. सेंद्रिय खतांचा पर्याय अधिक चांगला
बेसल डोससोबत शेणखत, गांडूळ खत, कंपोस्टसारख्या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास मातीचा पोत सुधारतो आणि खतांचा कार्यक्षम वापर होतो. सेंद्रिय घटकांची उपस्थिती जमिनीत अन्नद्रव्ये टिकवून ठेवण्यास मदत करते.
दरम्यान, बेसल डोसचा योग्य वापर केल्यास खरिपातील पिकांची उगवण, मुळांची वाढ, रोगप्रतिकारशक्ती आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून शास्त्रीय पद्धतीने खतांचा उपयोग केल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा मिळतो.
Mumbai,Maharashtra
June 16, 2025 8:33 AM IST