Last Updated:
Agriculture News : आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले.
मुंबई : पूररेषा केवळ ओळख पटवण्यासाठी नसून, तिच्या आत कोणतेही बांधकाम किंवा अतिक्रमण होणार नाही याची सक्तपणे दक्षता घ्या. या साठी अचूक सर्वेक्षण उपग्रह आधारित मॅपिंगद्वारे करावे, आणि आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले.
प्रभावी व्यवस्थापन आवश्यक
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपत्तीमुळे केवळ जीवित आणि वित्तहानी होत नाही, तर पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपत्तीपूर्व उपाययोजना आणि प्रभावी व्यवस्थापन अत्यावश्यक आहे.”
तांत्रिक आधुनिकीकरणावर भर
कोकणातील आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, चक्रीवादळांसाठी बहुउद्देशीय आसरे केंद्रे, दरड प्रवण भागात सुरक्षिततेसाठी बंधारे व संरक्षण भिंती, तसेच बीज अडथळा उपाययोजनांची अंमलबजावणी वेगात करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापनासाठी दिला जाणारा निधी फक्त आपत्तीनंतरच्या मदतीसाठी न वापरता, पूर्वतयारी आणि संरचनात्मक सौम्यीकरणासाठी खर्च करावा, असा स्पष्ट संकेतही त्यांनी दिला. पावसाळ्यानंतर खराब झालेली वीज वाहिन्या,रस्ते आणि बंधारे दुरुस्त करण्यासाठीही या निधीचा वापर करण्याचे निर्देश दिले.
नद्यांची सफाई आणि स्थानिक पातळीवरील तयारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नदीवाहन क्षमतेचा उल्लेख करत सांगितले,”नद्यांमधून गाळ आणि राडा-रोडा वेळीच काढून वाहून नेण्याचे काम जलसंपदा विभागाने प्राधान्याने करावे.” आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना आपत्ती व्यवस्थापन किट दिले जात आहेत. या किटचा वापर प्रत्यक्ष दुर्घटनांच्या वेळी होण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
Mumbai,Maharashtra
June 05, 2025 8:30 AM IST
पूरपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतींना किट वाटप; आपत्ती व्यवस्थापन बैठकीत काय निर्णय झाले?