Last Updated:
हळद लागवडीसाठी बेणे खरेदी करिता शेतकऱ्यांना बरेच पैसे मोजावे लागतात. नुकसान टाळून हळदीची 100 टक्के उगवण होण्यासाठी बीजप्रक्रिया आणि हळद लागवडीची शास्त्रीय पद्धत नेमकी काय आहे? जाणून घ्या.
सांगली : हळद लागवडीसाठी बेणे खरेदी करिता शेतकऱ्यांना बरेच पैसे मोजावे लागतात. बऱ्याचदा महागडी बियाणे वापरून देखील पिकाच्या उगवण क्षमतेला फटका बसतो. नुकसान टाळून हळदीची 100 टक्के उगवण होण्यासाठी बीजप्रक्रिया आणि हळद लागवडीची शास्त्रीय पद्धत नेमकी काय आहे? याविषयी हळद संशोधक डॉ. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे.
बीजप्रक्रिया
कंदमाशी आणि बुरशीजन्य रोगांपासून पिकाच्या रक्षणासाठी लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया व्यवस्थित करणे गरजेचे ठरते.
रासायनिक बेणे प्रक्रिया
क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) 2 मिलि अधिक कार्बेनडाझिम ( 50 टक्के पाण्यात मिसळणारे) 2 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात निवडलेले गड्डे 15 ते 20 मिनिटे बुडवावेत. नंतर बेणे सावलीत सुकवावे.
जैविक बेणे प्रक्रिया
ही बेणे प्रक्रिया लागवड करतेवेळी करावी. यामध्ये ऑझोस्पिरीलम 10 ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) 19 ग्रॅम आणि व्हॅम 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. द्रावणात बेणे 10 ते 15 मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे. अगोदर रासायनिक बेणे प्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये दोन ते तीन दिवस सुकवावे.
सरी वरंबा पद्धत
हळद पिकास पाट पाणी पद्धतीने सिंचन करावयाचे असल्यास ही पद्धत फायदेशीर ठरते.
या पद्धतीने लागवडीसाठी 75 × 90 सेंमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत मिसळावे.
जमिनीच्या उताराप्रमाणे 6 ते 7 सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्याची लांबी जमिनीचा उतार लक्षात घेऊन 5 ते 6 मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.
रुंद वरंबा पद्धत
ठिबक सिंचन पद्धती उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. रुंद वरंबा तयार करताना चार फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजवून 60 ते 75 सेंमी माथा असलेले 20 ते 30 सेंमी उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या लांबी रुंदीचे गादीवाफे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा. त्यानंतर 30 बाय 30 सेंमी अंतरावर लागवड करावी. लागवडीच्या वेळी गड्डे पूर्ण झाकले जातील, याची दक्षता घ्यावी.
एका गादीवाफ्यावर दोन ओळी बसवाव्यात. या पद्धतीसाठी जमीन समपातळीत असणे गरजेचे असते. रुंद वरंबा पद्धतीने हळद लागवड केल्यास वरंब्यांवर पडणाऱ्या जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. परिणामी कंदकूज रोगापासून हळद पिकाचे संरक्षण होते.
Sangli,Maharashtra
June 03, 2025 4:07 PM IST
Turmeric Cultivation: हळद पिकाच्या उगवण क्षमतेला नाही बसणार फटका, 100 टक्के उगवणीसाठी या 5 गोष्टी कराच! Video