शेती म्हणजे निसर्गाशी संवाद
शेतकऱ्याचं जीवन म्हणजे माती, पाणी, सूर्य आणि वाऱ्याशी सतत चाललेली बातचीत होय. तो कुठेही पर्यावरणासाठी ‘कॅम्पेन’ करत नाही, पण दररोज आपल्या कष्टातून पर्यावरणाची सेवा करतो. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवतो, निसर्गचक्र समजून घेत योग्यवेळी पेरणी करतो, मातीला विश्रांती देतो आणि आपलं जीवन निसर्गाशी बांधून ठेवतो.
जैविक शेती आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार
आज अनेक शेतकरी रासायनिक खते आणि कीटकनाशकांपासून दूर जात सेंद्रिय शेती, जैविक शेती, आणि शून्य-बजेट नैसर्गिक शेती (ZBNF) स्वीकारत आहेत. ही केवळ उत्पादनपद्धती नाही, तर पर्यावरणासाठी एक सकारात्मक क्रांती आहे.
परंपरागत पद्धतींचं पुनरुज्जीवन
शेतीत वापरली जाणारी पंचगव्य, जीवामृत, बिजामृत अशा परंपरागत भारतीय पद्धती केवळ जमिनीचा पोत सुधारत नाहीत, तर पर्यावरण रक्षणातही मोलाचं योगदान देतात. हे उपाय भूमीच्या आरोग्याची काळजी घेतात, भूजलाचे रक्षण करतात आणि जैवविविधतेला चालना देतात.
शेतकऱ्यांच्या वृक्षारोपण मोहिमा
काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत लाखो शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर झाडं लावतात. आंबा, चिंच, बोर, लिंबू, पेरू यासारख्या फळझाडांमुळे केवळ उत्पन्न वाढत नाही, तर पक्षांना आसरा अन् माणसांसाठी हवा तयार होते.
भावना आणि जबाबदारी यांची सांगड
शहरांमध्ये पर्यावरण दिन एक दिवस साजरा होतो, पण शेतकरी रोज तो जगतो. त्याचं निसर्गाशी असलेलं नातं हे केवळ तांत्रिक नाही तर भावनिक आहे. पाऊस नसेल तर तो देवासमोर हात जोडतो.पण पृथ्वीला दोष देत नाही.कारण तो पृथ्वीला ‘आई’ मानतो.
Mumbai,Maharashtra
June 05, 2025 10:45 AM IST
जमीन नव्हेतर काळी आई! पर्यावरण संवर्धनात शेतकऱ्यांचे योगदान किती? वाचा सविस्तर