1) अतिपर्जन्यामुळे मुळांच्या नासाडीची शक्यता
पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे मातीमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे झाडांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मुळे कुजतात व झाडाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. फुले फळे येण्यासाठी लागणारी ऊर्जा झाड गमावते.
उपाय – कुंड्यांमध्ये ड्रेनेज छिद्रांची तपासणी करा. माती जड किंवा चिकणसर असल्यास त्यात सेंद्रिय खत, कोकोपीट किंवा वाळू मिसळून माती हलकी करावी.
2) अन्नद्रव्यांची कमतरता
पावसाळ्यात मातीतील अन्नद्रव्ये धुऊन जातात. त्यामुळे झाडांना पोषण मिळत नाही, विशेषतः फॉस्फरस आणि पोटॅशियम यांची कमतरता फळे व फुले येण्यावर प्रभाव टाकते.
उपाय – झाडांना नियमितपणे सेंद्रिय खत (जसे कंपोस्ट, गांडुळखत) किंवा घरच्या घरी बनवलेले जीवामृत, सरभट खत वापरा. महिन्यातून एकदा फॉस्फरसयुक्त खत (DAP किंवा बोन मील) आणि पोटॅशियमयुक्त खत (सुल्फेट ऑफ पोटॅश) वापरणे उपयुक्त ठरेल.
3) सूर्यप्रकाशाचा अभाव
पावसाळ्यात आकाश सतत ढगाळ असल्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो. फुलझाडांना विशेषतः पूर्ण सूर्यप्रकाश आवश्यक असतो. प्रकाशअभावी फुलांची कळी तयारच होत नाही.
उपाय – शक्य असल्यास कुंड्यांची जागा बदलून अधिक प्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ठेवा.जर छपराखाली झाडं असतील तर त्यांना अधूनमधून थेट प्रकाशात ठेवा.
4) कीड व रोगांचा प्रादुर्भाव
पावसाळा हा बुरशीजन्य व किटकजन्य रोगांचा हंगाम असतो. पानांवर डाग, गळती, कीड दिसत असल्यास हे फळफुली न येण्याचे कारण ठरते.
उपाय – झाडांची नियमित तपासणी करा. निंबोळी अर्क, तंबाखूचा काढा किंवा जीवामृत यांचा फवारणीसाठी वापर करा.आवश्यकता असल्यास नैसर्गिक कीटकनाशकांची मदत घ्या.
5) फक्त वाढ होते
कधी-कधी झाडांची फक्त पाने व फांद्या वाढतात पण फुले येत नाहीत. हे नायट्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे होते.
उपाय – नायट्रोजनयुक्त खतांचा वापर मर्यादित करा. त्याऐवजी ‘बुडिंग’ किंवा ‘प्रूनिंग’ करून झाडाला योग्य दिशा द्या आणि फुलफळांची शक्यता वाढवा.
Mumbai,Maharashtra