जमिनीचे प्रकार आणि कायदेशीर व्याख्या
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, 1966 नुसार जमिनीचे तीन प्रमुख प्रकार आहेत:
जुनी शर्तीची जमीन (वर्ग 1)
नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2)
शासकीय पट्टेदार जमीन
1) जुनी शर्तीची जमीन (वर्ग 1) – सर्वस्वी मालकीची जमीन
या प्रकारात शेतकरी ही जमीन खासगी मालकीने वापरत असतो. सातबाऱ्यावर “खा” असा उल्लेख असतो, जो भोगवटादार वर्ग 1 दाखवतो. या जमिनीवर मालकाला कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्याची गरज नसते. ही जमीन संपूर्णपणे विक्रीसाठी मोकळी असते. याची कायदेशीर व्याख्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 29 (2) मध्ये नमूद आहे.
2) नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2) – अटींसह मिळालेली जमीन
हा प्रकार इनाम, वतन, पुनर्वसन किंवा शासनाकडून कसण्यासाठी दिलेल्या जमिनीचा आहे. ही जमीन जरी शेतकऱ्याच्या ताब्यात असली, तरी तिच्या विक्रीसाठी शासनाच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक असते. यासोबतच विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा सरकारकडे जमा करावा लागतो. याची व्याख्या कलम 29 (3) मध्ये दिली आहे. या जमिनीची नोंद गाव नमुना क्रमांक 1-क मध्ये केली जाते.
3) शासकीय पट्टेदार जमीन – भाडेतत्त्वावर देण्यात आलेली
शासनाने विशिष्ट कालावधीसाठी भाड्याने दिलेल्या जमिनीचे हक्क पट्टेदारांना दिले जातात. परंतु ही जमीन खरेदी किंवा विक्रीसाठी मुळातच खुली नसते. यासाठी विशिष्ट अटी आणि कालमर्यादा लागू होतात. याची व्याख्या महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 2 (11) मध्ये नमूद आहे.
नवीन शर्तीची जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी
अनेक वेळा कमी किमतीत जमीन मिळते म्हणून नागरिक शॉर्टकट वापरतात आणि शासनाच्या परवानगीशिवाय व्यवहार करतात. मात्र हे पूर्णपणे बेकायदेशीर असून, भविष्यात जमीन गमावण्याची किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नवीन शर्तीच्या जमिनी खरेदी करताना सक्षम अधिकाऱ्याची लेखी परवानगी आणि आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे.
Mumbai,Maharashtra
May 20, 2025 11:50 AM IST
तुमच्या सातबाऱ्यावर जमीन शर्त, धारणप्रकार याचा उल्लेख आहे का? अन्यथा होईल मोठं नुकसान