Last Updated:
Monsoon 2025 : महाराष्ट्रातील मान्सूनने आता वेग घेतला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) 1 जुलै 2025 रोजी राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. नैऋत्य मान्सूनच्या सक्रियतेमुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील मान्सूनने आता वेग घेतला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) 1 जुलै 2025 रोजी राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. नैऋत्य मान्सूनच्या सक्रियतेमुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दरवर्षी जून महिन्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू होतो, मात्र जुलैमध्ये मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय होतो. यंदाही असाच अंदाज वर्तवण्यात आला असून, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे.
कोकण विभागात पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत 50 ते 100 मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण आणखी जास्त राहून 100 ते 150 मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद पडण्याची, तसेच नद्या आणि नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा असणार आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात 40 ते 120 मिमी पाऊस पडू शकतो. या भागात ढगाळ वातावरण आणि विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांनी काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर तुलनेने कमी राहील. औरंगाबाद, जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटही संभवतो. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.
विदर्भ विभागात देखील 1 जुलैपासून पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 28 आणि 29 जूनपासून विदर्भात मान्सून सक्रिय होत असून, काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस होईल. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात पावसामुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि पुणे शहरांमध्ये पावसामुळे हवेची गुणवत्ता मध्यम ते समाधानकारक राहील, तर ग्रामीण भागात हवा चांगल्या गुणवत्तेची असेल. या काळात नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, समुद्रकिनारी किंवा नदीकाठच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Mumbai,Maharashtra
July 01, 2025 9:32 AM IST
कृषी हवामान : पावसाचा दणका! वादळी वारे सुटणार, अतिमुसळधार बरसणार, या जिल्ह्यांना अलर्ट जारी