पुण्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. अर्ध्या तासापासून शहरातील कात्रज, स्वारगेट, सिंहगड रोड, हडपसर आदी भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण परिसरात जोरदार पावसामुळे रस्ते पाण्याने भरले असून, काही भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात येतोय.
अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे भागांत आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांची अडचण झाली आहे.
दक्षिण रायगडमधील म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यात सकाळपासून पाऊस सुरु आहे. ढोरजे पूल पाण्याखाली गेल्यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे. म्हसळा-दिघी मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भिसे खिंड (नागोठणे–रोहा मार्ग) येथे दरड कोसळल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. पावसाचा फटका लक्षात घेता माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 15 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर जोरदार पावसाचा अनुभव आला असून आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोडामार्गमध्ये 123 मिमी आणि सावंतवाडीत 114 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील 25 गावांचा वीज पुरवठा गेल्या 14 तासांपासून बंद आहे.
सातारा आणि सांगली जिल्ह्यांत कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांनी उघडले असून, 5,000 क्यूसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत केलं असून, प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नागरिकांनी अधिकृत सूचना आणि हवामान खात्याच्या अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवून सावधगिरी बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
Mumbai,Maharashtra
July 15, 2025 12:16 PM IST
पावसानं सळो की पळो करून सोडलं! रेड अलर्ट जारी, या जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर