Last Updated:
Monsoon 2025 : राज्यभरात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून, 3 जुलैपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा प्रभाव अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
मुंबई : राज्यभरात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून, 3 जुलैपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा प्रभाव अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. विभागाने स्पष्ट केले की उत्तर-पश्चिम, मध्य व पूर्व भारतात मान्सून सक्रिय राहील. मध्य महाराष्ट्रात 3 जुलैपासून पुढील 6 ते 7 दिवसांत काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत 40 ते 120 मिमी पावसाची नोंद होऊ शकते. सातारा आणि कोल्हापुरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
मराठवाड्यात काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूरमध्ये 10 ते 20 मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे, तर यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. खानदेशातील जळगाव व धुळे जिल्ह्यांत हलका पाऊस आणि काही भागांत मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान खात्याने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पेरणी करण्याआधी पावसाची स्थिती नीट पाहावी. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी पाण्याचा योग्य निचरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते, तसेच मुंबईतील काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याचेही खात्याने सांगितले.
Mumbai,Maharashtra
July 03, 2025 8:52 AM IST
कृषी हवामान : पुढील 6 दिवस धोक्याचे! अतिमुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट