Last Updated:
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या मान्सूनचा प्रभाव काही भागांत मर्यादित राहिला असला तरी पुढील काही तासांत काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई: राज्यात सध्या मान्सूनचा प्रभाव काही भागांत मर्यादित राहिला असला तरी पुढील काही तासांत काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 4 जुलै रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागात कोरडे अथवा ढगाळ हवामान राहणार असले तरी कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सह्याद्री घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोल्हापूरच्या घाट भागात आणि सिंधुदुर्गात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे आणि पालघर या किनारी जिल्ह्यांत पुढील काही तासांत जोरदार पाऊस पडू शकतो. यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभर आकाश ढगाळ राहील, कधीकधी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उपनगरांमध्येही काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ या भागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात.
राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 4 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र या भागात ताशी जोरदार पावसाचा धोका फारसा नाही. विदर्भातही दिवसभर ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाचा जोर तुलनेने कमी राहील. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, 5 जुलैपासून पावसाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होईल. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत 5 जुलैपासून जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी, नागरिक व स्थानिक प्रशासनाने यासाठी आधीपासूनच आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
5 आणि 6 जुलै या दोन दिवसांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता असून, नद्या व नाले तुडुंब भरू शकतात. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे व पुराची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी.
Mumbai,Maharashtra
July 04, 2025 8:58 AM IST
कृषी हवामान : 4,5,6 जुलैला पावसाचा जोर वाढणार, नद्या नाले ओसंडून वाहणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा