1) सातबारा उतारा आणि फेरफार नोंदी तपासणे
संबंधित गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा उतारा मिळवावा. फेरफार आणि आठ-अ उतारा तपासून, जमिनीच्या मालकीबाबत खात्री करून घ्यावी. विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव सातबारा उताऱ्यावर आहे का, हे पाहणे गरजेचे आहे.कोणत्याही कर्जाचा बोजा किंवा न्यायालयीन वाद असल्यास त्या संदर्भातील माहिती घ्यावी. सरकारी नकाशानुसार जमिनीवर नियोजित महामार्ग, रस्ते किंवा इतर प्रकल्प येत आहेत का, हे तपासून पाहावे.
2) भूधारणा प्रकार समजून घेणे
जमिनीचा सातबारा उतारा मिळाल्यानंतर ती कोणत्या भूधारणा प्रकारात मोडते, हे तपासणे आवश्यक आहे. “भोगवटादार वर्ग-1” असलेल्या जमिनींना हस्तांतराची कोणतीही अडचण नसते. “भोगवटादार वर्ग-2” प्रकारातील जमिनी विकत घेण्यासाठी सरकारी परवानगी घ्यावी लागते. देवस्थान इनाम किंवा भूमिहीन शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनी खरेदी करण्याआधी योग्य प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. सरकारी पट्टेदार जमिनी भाडेतत्त्वावर दिलेल्या असतात, त्यामुळे अशा जमिनी खरेदी करण्याआधी नियम समजून घ्यावेत.
3) जमिनीचा नकाशा तपासणे
ज्या गटातील जमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा मिळवून त्याचा अभ्यास करावा. जमिनीच्या हद्दी आणि चतु:सीमा स्पष्ट करावी. जमिनीच्या आजूबाजूच्या गट नंबर आणि शेजारील जमीनधारकांची माहिती घ्यावी. सरकारी नकाशात कोणतेही बदल झाले आहेत का, हे खात्री करून घ्यावे.
4) शेतरस्त्याची खात्री करणे
संबंधित जमिनीपर्यंत जाण्यासाठी योग्य शेतरस्ता आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बिनशेती जमिनींमध्ये नकाशावर दाखवलेला रस्ता असतो, पण शेतीयोग्य जमिनीसाठी खाजगी रस्ता असल्यास संबंधित मालकाची संमती आवश्यक असते. जर रस्ता नसल्यास, भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे याची योग्य नोंद घेणे आवश्यक आहे.
5) खरेदी खत आणि कायदेशीर प्रक्रिया
तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व कागदपत्रे पूर्ण करून योग्य शुल्क भरून खरेदी खत करणे गरजेचे आहे. गट नंबर, मूळ मालकाचे नाव, क्षेत्रफळ, चतु:सीमा, सर्व कायदेशीर बाबी नीट तपासाव्यात. जमिनीचा कोणताही वादविवाद नसेल, याची खात्री करूनच अंतिम खरेदी करावी.खरेदी खत नोंदणी झाल्यानंतर त्याची प्रत सुरक्षित ठेवावी.
Mumbai,Maharashtra
April 16, 2025 10:44 AM IST
Agriculture Land : शेतजमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा! अन्यथा होईल लाखोंचे नुकसान