पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाच्या सरी वाढू लागल्या आहेत. रविवारी (6 जुलै) तयार झालेली प्रणाली पुढील 24 तासांत झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत जाणवतो आहे. दक्षिण गुजरात आणि दक्षिण कर्नाटकच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे दमदार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखेडा येथे सर्वाधिक 190 मिमी पाऊस पडला. तसेच, कोकणातील इतर भागांमध्ये 100 मिमीपेक्षा जास्त पावसाच्या सरी कोसळल्या. या भागांतील नद्या आणि ओढ्यांना पूर येण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज (7 जुलै) रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून नदीकाठच्या गावांना धोका वाढण्याची चिन्हे आहेत.
तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हवामान विभागाने वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.
रविवारी (6 जुलै) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील उच्चांकी 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाचा जोर असला तरी काही जिल्ह्यांत उष्णतेची तीव्रता टिकून राहिली आहे.
राज्यातील कृषी, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नद्यांच्या पाणी पातळ्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदीकिनाऱ्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच विजांच्या गडगडाटाच्या वेळी उघड्यावर न राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Mumbai,Maharashtra
July 07, 2025 8:34 AM IST
कृषी हवामान : आठवड्याच्या सूरवातीलाच पावसाचा धुमाकूळ,पुढील 24 तास धोक्याचे,या जिल्ह्यांना अलर्ट जाहीर