पूर्वी थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल आणि श्रीलंकेत लोकप्रिय असलेले ड्रॅगन फ्रुट आता भारतातही मोठ्या प्रमाणावर यशस्वीरीत्या पिकवले जात आहे. त्याची बाजारातील मागणी दिवसेंदिवस वाढत असून प्रतिकिलो दर 200 ते 300 रुपये इतका आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे फळ उत्पन्नाचा फायदेशीर स्रोत म्हणून पाहू लागले आहेत.
कमी पाण्यावर चांगले उत्पादन
ड्रॅगन फ्रुट कमीतकमी पावसातही चांगले उत्पादन देतो. हे फळ 50 सेमी वार्षिक पाऊस आणि 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात सहज उगम पावते. विशेष म्हणजे याला फारसा सूर्यप्रकाशही लागत नाही, त्यामुळे शेड नेटच्या सहाय्याने याची शेती शक्य होते.
या फळाचा उपयोग जॅम, जेली, वाइन, फळांचा रस आणि आईस्क्रीम उत्पादनात केला जातो. तसेच, हे फेसपॅकमध्ये वापरले जाणारे फळ असल्याने त्याचा सौंदर्यउद्योगातही वापर वाढतो आहे.
लागवडीची पद्धत आणि उत्पन्न
एक हेक्टर क्षेत्रात लागवड सहज शक्य. दोन रोपांमधील अंतर साधारण 2 मीटर असावे. एक रोप 50 ते 60 फळे देते, आणि प्रत्येक फळाचे वजन सुमारे 400 ग्रॅम असते. पहिल्या वर्षापासूनच फळ मिळण्यास सुरुवात होते. मे-जूनमध्ये फुले आणि डिसेंबरमध्ये फळ तयार होते. लागवड करताना 50 x 50 x 50 सेमी खड्डे खणून त्यात रोप लावावे. प्रारंभी लाकडी किंवा लोखंडी काठीने रोपांना आधार दिल्यास चांगली वाढ होते.
नफा आणि गुंतवणूक
ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी सुरुवातीला 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो, मात्र दरवर्षी एक एकरातून 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याला कमी पाण्याची गरज असल्यामुळे पाण्यावरचा खर्चही कमी होतो.
कोणत्या भागांत लागवड केली जाते?
भारतभरात ड्रॅगन फ्रुटची लागवड वेगाने वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात या शेतीकडे वळले आहेत.
लागवडीसाठी वालुकामय चिकणमाती आणि सेंद्रिय कर्बयुक्त जमीन उपयुक्त ठरते, आणि जमिनीचा सामू (pH) 5.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.
आरोग्यदायी फळ
ड्रॅगन फ्रुट केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, कोलेस्ट्रॉल घटवते आणि हृदयरोग, सांधेदुखी यावरही उपयुक्त ठरते. यामध्ये फॅट आणि प्रोटिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते संपूर्ण कुटुंबासाठी पौष्टिक आहार ठरते.
Mumbai,Maharashtra
May 29, 2025 10:36 AM IST