Last Updated:
शेतकरी दाम्पत्याने मशागतीसाठी स्वतःला वखराला जुंपून घेतले आहे. ही कहाणी आहे लिहा गावातील अरुण सोनवणे या अल्पभूधारक शेतकऱ्याची.
जालना : नुकतच मुलीचे लग्न झाले आहे. लग्नात बराच पैसा खर्च झाला आहे. शेतीसाठी खाजगी बँक आणि सावकाराकडून कर्ज घेतले आहे. शेतीच्या मशागतीसाठी सव्वा लाखाची एक बैलजोडी खरेदी केली आहे. परंतु अवघ्या काहीच दिवसांत ही बैलजोडी चोरट्याने चोरून नेली आहे. पोलिसात तक्रार केल्यानंतरही या बैलजोडीचा शोध लागत नाहीये. म्हणूनच हताश झालेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याने मशागतीसाठी स्वतःला वखराला जुंपून घेतले आहे. ही कहाणी आहे लिहा गावातील अरुण सोनवणे या अल्पभूधारक शेतकऱ्याची. या शेतकऱ्यावर ही वेळ का आली? पाहुयात.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिहा हे एक छोटे खेडेगाव. अरुण सोनवणे हे या गावातील साडेचार एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी. निसर्गाच्या दृष्टचक्रांनी आधीच शेतकरी पिचून गेला आहे. त्यातच मुलीच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्च झाल्याने आधीच कर्जबाजारी झालेल्या अरुण सोनवणे यांची तब्बल सव्वा लाख रुपये किंमतीची बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेली.
या गोष्टीची पारद पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार देखील दाखल केली. परंतु अनेक दिवस झाले बैलजोडीचा शोध लागत नाही. मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आहे. शेतीची मशागत बाकी आहे. बैलजोडी तर चोरीला गेली आहे. मग करायचे काय? आधीच कर्जबाजारी असल्याने कर्ज घेऊन मशागत करणे परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी आपली पत्नी आणि स्वतः वखराला जुंपून शेतीची मशागत सुरू केली आहे.
अरुण सोनवणे यांना एक मुलगा देखील आहे. त्याचे शिक्षण सुरू आहे. मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, शेतीची मशागत आणि चोरी गेलेली बैलजोडी अशा दृष्टचक्रात सोनवणे कुटुंब अडकले. त्यामुळेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच वखराला जुंपून शेताची मशागत करणे योग्य समजले. एक तर पोलिसांनी बैलजोडीचा शोध लावावा किंवा प्रशासनाने आम्हाला मशागतीसाठी बैलजोडी द्यावी, अशी मागणी करून सोनवणे यांनी सरकारकडे केली आहे.
Jalna,Maharashtra
Jalna News : बैलजोडी गेली चोरीला, हताश झालेल्या शेतकऱ्यानं कारभारणीला जुंपलं वखराला, डोळ्यात पाणी आणणारा Video