Last Updated:
जिल्ह्यात सर्व पशूंना देण्यासाठी प्री मान्सून या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरण फेरीत लंपी, एचएस, लासोटा लस, अशा विविध प्रकारच्या लसीचे लसीकरण संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सर्व पशूंना देण्यासाठी प्री मान्सून या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरण फेरीत लंपी, एचएस, लासोटा लस, अशा विविध प्रकारच्या लसीचे लसीकरण संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पशुपालक आणि शेतकऱ्यांनी आपल्या पशूंना लागणाऱ्या लसी द्याव्यात. मान्सून पूर्व लस घेतली तर निश्चितच आपले पशुधन आजारी पडणार नाही, असे पशुधन विकास अधिकारी एम.जे तळेकर यांनी लोकल १८ सोबत बोलताना सांगितले.
प्री मान्सून या लसीकरणाला सुरुवात झाली असून यामध्ये गाय वर्गीय जनावरे असतील तर त्यांना लंपी, म्हैस वर्गीयसाठी घटसर्पाची लस, दोन ते तीन वर्षांचे गोऱ्ह्यांना डीक्यू, शेळी वर्गीयसाठी इटीव्हीची लस टोचून घ्यायला हवी. तसेच मेंढ्यांसाठी सीपॉक्स ही लस टोचावी. पोल्ट्रीमध्ये लासोट आणि दुसरी फौल पॉक्स या लसी पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या पशूंना टोचून घ्याव्यात. यामुळे पशु आजारी पडणार नाही, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि छत्रपती संभाजीनगर पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पावसाळ्यापूर्वी पशु आणि जनावरे आजारी पडू नये म्हणून प्री मान्सून या लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा फायदा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन देखील तळेकर यांनी केले आहे. लसीकरण करण्याच्या प्रक्रियेत कोणाला काही अडचण आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण पूर्ण करू शकता, असे सांगण्यात आले.
Aurangabad,Maharashtra