Last Updated:
Agriculture News : हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मॉन्सून सध्या पश्चिम किनारपट्टीवर स्थिरावलेला आहे. केवळ कोकण किनारपट्टी आणि काही मर्यादित भागांमध्ये हलकासा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वातावरणातील बदलामुळे यावर्षी मॉन्सूनचा प्रवास अपेक्षेपेक्षा मंदावलेला असून, किमान 10 जूनपर्यंत तरी तो पुढे सरकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या पेरण्या किंवा लागवडीस सुरुवात करणे धोक्याचे ठरू शकते.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मॉन्सून सध्या पश्चिम किनारपट्टीवर स्थिरावलेला आहे. केवळ कोकण किनारपट्टी आणि काही मर्यादित भागांमध्ये हलकासा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे, त्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेषतः विदर्भात कमाल तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागांत तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान राहणार आहे. अशा कोरड्या आणि तापदायक हवामानात पेरण्या सुरू केल्या गेल्यास बीजधारणेवर विपरित परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
“कोरडवाहू शेतकऱ्यांनी खासकरून कोणत्याही अफवा किंवा खोट्या संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच्या आधारेच पेरणीसंबंधी निर्णय घ्यावा,” असे कृषी विभागाकडून आवर्जून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी काही भागांमध्ये वेळेआधी पेरण्या करून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यंदा अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला असून, “मॉन्सून नियमितपणे आणि पुरेशा प्रमाणात पुढे सरकेपर्यंत पेरणी थांबवणेच योग्य,” असे मत नोंदवले आहे. कारण पेरणीनंतर काही दिवस सतत कोरडे हवामान राहिल्यास बीज उगम होण्यापूर्वीच वाळून जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैसे वाया जाण्याचा धोका वाढतो.
सध्या खरिपासाठी तयारी सुरू असून, अनेक ठिकाणी नांगरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पेरणीसाठी पावसाचा प्रथम आणि स्थिर बरसणा-या टप्प्याची प्रतीक्षा करणे अत्यावश्यक आहे. हवामान खात्याच्या अद्ययावत माहितीचा अवलंब करतच शेतीसंबंधी निर्णय घ्यावेत, असे आवाहन संबंधित प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे.
Mumbai,Maharashtra
June 03, 2025 9:03 AM IST