स्वअर्जित मालमत्ता आणि वडिलांचा अधिकार
जर मालमत्ता वडिलांनी स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेली असेल (स्वअर्जित मालमत्ता), तर त्या मालमत्तेवर त्यांना पूर्ण हक्क असतो. वडील ही मालमत्ता गिफ्ट डीड, वसीयत (Will), किंवा विक्रीच्या माध्यमातून त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकतात. त्यांनी ती मालमत्ता केवळ एका मुलाच्या नावावर केली असेल, तर दुसऱ्या मुलाला त्यावर कायदेशीर दावा करता येत नाही.
वडिलोपार्जित मालमत्ता आणि समान हक्क
मात्र जर ती मालमत्ता वडिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा वंशपरंपरागत वारशाने मिळाली असेल (वडिलोपार्जित मालमत्ता), आणि ती अद्याप विभागली गेली नसेल, तर ती सर्व वारसदारांची मिळकत मानली जाते. अशा प्रकारे, वडील एकट्याने ती मालमत्ता कोणालाही देऊ शकत नाहीत. सर्व भावंडांना त्यावर समान हक्क असतो. अशा वेळी दुसऱ्या मुलाने त्याचा हक्क कायदेशीररित्या मागितल्यास तो वैध मानला जातो.
वसीयत असल्यास काय?
वडिलांनी जर वसीयत केली आणि त्यामध्ये संपूर्ण मालमत्ता एका मुलाच्या नावे केली, तर ती वसीयत फक्त त्यांच्या मृत्यूनंतर अंमलात येते. मात्र, वसीयत वैध आहे की नाही, यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया अवलंबून असते. जर वसीयत फसवणूक, दबाव, किंवा मानसिक त्रासाच्या आधारावर तयार केली गेली असेल, तर इतर भावंड त्यास कोर्टात आव्हान देऊ शकतात.
कायदेतज्ज्ञांचे मत काय?
कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “जर मालमत्ता वडिलांनी स्वतःच्या कष्टाने मिळवलेली असेल आणि ती त्यांनी एका मुलाला कायदेशीर पद्धतीने दिली असेल, तर इतर भावंडांना कोणताही कायदेशीर दावा करता येत नाही. मात्र वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत, कोणत्याही एकट्या वारसाचा पूर्ण हक्क मान्य केला जात नाही.”
(महत्वाची सूचना – सदर बातमी फक्त माहिती करिता आहे. कोणतीही कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घ्यावा)
Mumbai,Maharashtra
June 13, 2025 1:35 PM IST
वडिलांनी एकाच मुलाच्या नावावर मालमत्ता केल्यास दुसऱ्या मुलाचा काय हक्क राहतो? नियम, कायदा काय सांगतो?