Last Updated:
Agriculture News : सन 2023–24 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून सुमारे 445 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
मुंबई : सन 2023–24 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून सुमारे 445 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यातील 245 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आले असून, उर्वरित रक्कम लवकरच देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती विधानसभेत दिली. ते म्हणाले की, उर्वरित निधी दोन ते तीन दिवसांत डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
“शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे,” असे मंत्री जाधव-पाटील यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, एनडीआरएफच्या निकषांपेक्षा कमी मदत कोणत्याही शेतकऱ्याला दिली जाणार नाही.
शेतपिकांचे नुकसान झाल्यानंतर संबंधित विभागांकडून तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला पाठवला जातो. अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना मदत वितरित केली जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर, लोणार, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये गेल्या काही काळात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
65 मिमीहून अधिक पाऊस झाल्याने 50,397 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मूग, भाजीपाला या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत तातडीने मिळावी, यासाठी पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले की, “बाधित शेती व घरांच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच, एनडीआरएफच्या निकषांनुसार तात्काळ मदतीचे वितरण सुरू होईल. शासनाकडून शेतकऱ्यांना यापुढेही वेळेत मदत मिळेल, याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Mumbai,Maharashtra
July 03, 2025 3:23 PM IST
पीक नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार! पण कधी? मंत्री जाधव-पाटील यांनी दिली माहिती