Last Updated:
Agriculture News : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांकडून डिएपी (Di-Ammonium Phosphate) खताची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र, डिएपी खताचा तुटवडा जाणवत असल्याने, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांकडून डिएपी (Di-Ammonium Phosphate) खताची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र, डिएपी खताचा तुटवडा जाणवत असल्याने, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
डिएपी खतामध्ये 18 टक्के नत्र आणि 46 टक्के स्फुरद या अत्यावश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण असते. त्यामुळे अनेक पिकांच्या वाढीसाठी हे खत उपयुक्त मानले जाते. मात्र, मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेल्या तफावतीमुळे डिएपीचा पुरवठा मर्यादित झाला आहे.
एसएसपी एक उपयुक्त पर्याय
डिएपीला पर्याय म्हणून एसएसपी (Single Super Phosphate) हे खत अत्यंत उपयुक्त ठरू शकते. एसएसपी खत देशांतर्गत उत्पादनातून मिळते आणि त्यात १६ टक्के स्फुरद, सल्फर आणि अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश असतो. विशेषतः तेलबिया पिकांमध्ये सल्फरचे महत्त्व अधिक असल्यामुळे एसएसपीचा वापर फायदेशीर ठरतो.
कृषी तज्ज्ञांच्या मते, डिएपीच्या एका गोणीच्या ऐवजी अर्धी गोणी युरिया व तीन गोणी एसएसपी खत एकत्रित वापरणे ही एक चांगली पर्यायी पद्धत आहे. यामुळे नत्र आणि स्फुरद या दोन्ही अन्नद्रव्यांची गरज भागते.
संयुक्त खतांचा फायदेशीर वापर
डिएपीचा तुटवडा भरून काढण्यासाठी एनपीके प्रकारातील संयुक्त खते देखील उपयुक्त ठरतात. या खतांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे तिन्ही आवश्यक अन्नद्रव्ये मिळतात. खालील एनपीके संयोजन असलेली खते सध्या बाजारात उपलब्ध आहेत
एनपीके – 10:26:26
एनपीके – 20:20:0:13
एनपीके – 12:32:16
एनपीके – 15:15:15
या खतांचा संतुलित वापर केल्यास पिकांची चांगली वाढ होते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
टिएसपी – डिएपीचा आणखी एक पर्याय
टिएसपी (Triple Super Phosphate) हे खत सुद्धा डिएपीसारखेच ४६ टक्के स्फुरद पुरवते. शेतकऱ्यांनी डिएपीच्या एका गोणीच्या ऐवजी अर्धी गोणी युरिया व एक गोणी टिएसपी खत वापरल्यास तोही उत्तम पर्याय ठरतो.
Mumbai,Maharashtra