Last Updated:
Poultry Farming: उन्हाळ्यात तापामानामुळं कुक्कुटपालन उद्योगात नुकसान होण्याची शक्यता असते. अमरावतीतील एका शेतकऱ्यानं कोंबड्यांसाठी खास जुगाड केलंय.
अमरावती : उन्हाळ्यामध्ये विदर्भातील तापमान हे 40 अंशांच्या पार जातं. वाढत्या तापमानाचा फक्त नागरिकांनाच नाही तर प्राणी आणि पक्षांना सुद्धा त्रास होतो. ज्यांच्याकडे पोल्ट्री फार्म आहे त्यांना तर उन्हाळा अतिशय कठीण जातो. त्यांचे अनेक वेळा नुकसानही होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि उन्हाच्या त्रासापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी अमरावतीमधील अंजनगाव बारी येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी एक सिस्टीम सुरू केली आहे. त्यांनी टाइमर असलेले फॉगर कोंबड्याच्या बचावासाठी लावले आहे. त्याचबरोबर ठिबकची नळी लावून सुद्धा एक वेगळा प्रयोग केलाय.
अंजनगाव बारी येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यामुळे ते प्रत्येक परिस्थितीमध्ये जागरूक असतात. त्यांना मिळालेल्या अनुभवातून ते अजूनही शेती आणि पोल्ट्री फार्म असे दोन व्यवसाय चालवतात.
कोंबड्याच्या बचावासाठी दोन प्रयोग
रविंद्र मेटकर लोकल 18 शी बोलताना सांगतात की, माझ्याकडे 1 लाख 80 हजार कोंबड्या आहेत. त्याचे उन्हाळ्यात व्यवस्थापन करायला खूप त्रास होतो. अनेक कोंबड्या मरतात आणि नुकसान होते. तर यावर उपाय म्हणून मी टाइमर असलेले फॉगर लावले आहे. 1 लाख 80 हजार कोंबड्यांच्या बचावाचे नियोजन करणे खूप कठीण होते. त्यामुळे काहींसाठी स्वयंचलित सिस्टीम आहे. ती पूर्णतः वातानुकूलित असल्याने त्यात इतका त्रास होत नाही.
पण, पत्राच्या शेडमध्ये तापमान संतुलित ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आम्ही करून बघितले. एक प्रयोग म्हणजे टाइमर असलेले फॉगर. दुसरे म्हणजे शेडच्या सभोवताल बारदानी लावली. त्यावर एक ठिंबकची नळी लावली. त्यातून थेंब थेंब पाण्यामुळे ती फारी ओली होते आणि पक्षांना थंड वातावरण मिळते.
या प्रयोगातून होतोय फायदा
या दोन्ही सिस्टीममुळे मला खूप फायदा होत आहे. फॉगरला टाइमर असल्याने कोंबड्या ओल्या होत नाही. त्यामुळे त्यांना अन्न व्यवस्थित सेवन करता येत. अन्न व्यवस्थित मिळाल्याने अंडी छान देतात. त्याचबरोबर पक्षांची मर कमी होते आणि नुकसान होत नाही. बाहेर जर तापमान 44 अंश सेल्सिअस इतके असेल तर हे प्रयोग केल्यानंतर शेडमध्ये 37 अंश सेल्सिअस इतके तापमान अनुभवायला मिळते, असे रविंद्र सांगतात.
Amravati,Maharashtra
May 16, 2025 11:11 AM IST