Last Updated:
Agriculture News : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या ऊसावर प्रथम अॅडव्हान्स म्हणून 2800 रुपये प्रति मेट्रिक टन दिले असून, उर्वरित 280 रुपये प्रति मेट्रिक टनांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.
पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या ऊसावर प्रथम अॅडव्हान्स म्हणून 2800 रुपये प्रति मेट्रिक टन दिले असून, उर्वरित 280 रुपये प्रति मेट्रिक टनांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बेंडे म्हणाले की, संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गाळप हंगाम 2024-25 दरम्यान एकूण 11 लाख 38 हजार 496 मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला असून, त्यावर आधारित 31 कोटी 87 लाख 78 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दहा तारखेपर्यंत जमा होणार आहे.
या हंगामात 12 टक्के साखर उतारा गृहित धरून एफआरपी 3100 रुपये प्रति मेट्रिक टन निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार प्रथम अॅडव्हान्स 2800 रुपये दिल्यानंतर उर्वरित 280 रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे. उच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्णयानुसार एफआरपी रकमेतील फरक अदा करण्यात येत आहे.
यापूर्वी देखील प्रत्येक गाळप हंगामानंतर फरकाची रक्कम नियमाप्रमाणे अदा केली गेली आहे. त्यामुळे एफआरपीबाबत गैरसमज पसरवू नयेत, अशी टीका बेंडे यांनी केली.
यंदाच्या गाळप हंगामात 12 लाख 52 हजार 600 पोत्यांचे साखर उत्पादन झाले आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पामार्फत 7 कोटी 33 लाख युनिट वीज निर्मिती करून त्यापैकी 3 कोटी 64 लाख 45 हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात करण्यात आली आहे.
तसेच, 90 केएलपीडी डिस्टिलरी प्रकल्पातून आजअखेर 1 कोटी 19 लाख 10 हजार बल्क लिटर रेक्टिफाइड स्पिरिटचे उत्पादन करण्यात आले आहे.
Mumbai,Maharashtra
April 28, 2025 12:04 PM IST
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! हा साखर कारखाना एफआरपीचे पैसे खात्यावर करणार जमा