Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी देवस्थान, मंदिरे, मठ, संस्थान यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतीची जमीन असते. ही जमीन शेतकऱ्यांना शेतभाडेपट्ट्यावर (लीजवर) दिली जाते. मात्र, ही जमीन खरेदी करता येते का? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात असतो.
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी देवस्थान, मंदिरे, मठ, संस्थान यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतीची जमीन असते. ही जमीन शेतकऱ्यांना शेतभाडेपट्ट्यावर (लीजवर) दिली जाते. मात्र, ही जमीन खरेदी करता येते का? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात असतो. कायद्यानुसार देवस्थानाच्या मालकीची जमीन थेट खरेदी करणे सहज शक्य नसते. यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आणि शासनाची परवानगी अनिवार्य असते.
मंदिर व देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर कोणत्याही व्यक्तीचा कायमस्वरूपी मालकी हक्क नाही. अनेकदा धार्मिक संस्थांनी शेतकऱ्यांना ही जमीन वार्षिक भाडेपट्ट्यावर किंवा काही कालावधीसाठी उपयोगासाठी दिलेली असते. काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या शेतकरी ही जमीन कसत आले असतात, पण तरीही त्यावर त्यांचा कायदेशीर मालकी हक्क आपोआप मिळत नाही.
महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन कायदा किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था कायदा यानुसार देवस्थान ट्रस्टच्या मालकीची मालमत्ता ‘धार्मिक उद्देशासाठी’ असते. त्यामुळे अशा जमिनींची विक्री करण्यासाठी संबंधित धर्मादाय आयुक्तांची (Charity Commissioner) पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. ही परवानगी न घेता देवस्थानची जमीन कोणालाही विकता किंवा ताब्यात देता येत नाही.
जर देवस्थान ट्रस्टला जमीन विकायची असेल, तर सर्वप्रथम ट्रस्ट मंडळाने ठराव करून विक्रीचा निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज सादर करावा लागतो. अर्जात विक्रीचे कारण स्पष्ट करणे आवश्यक असते, जसे की देवस्थानच्या कामकाजासाठी निधीची गरज, देखभाल खर्च किंवा अन्य महत्त्वाचे धार्मिक कार्य.
धर्मादाय आयुक्त कार्यालय या अर्जाची सखोल छाननी करते. त्या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी किंवा पट्टेदारांनी आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. काही प्रकरणांमध्ये, जेथे शेतकरी अनेक वर्षांपासून ही जमीन कसत आलेले असतात, तिथे त्यांना ‘पट्टेदार हक्क’ दिला जाऊ शकतो. मात्र तरीही अंतिम मालकी हस्तांतर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची मान्यता घेणे अनिवार्य असते.
जर परवानगी मिळाली, तर ठरावीक बाजारमूल्यावर किंवा शासनाने ठरवलेल्या दरावर विक्री प्रक्रिया राबवली जाते. विक्रीची रक्कम देवस्थानच्या खात्यात जमा केली जाते आणि ती इतर कोणत्याही संस्थेसाठी वापरता येत नाही.
Mumbai,Maharashtra
June 30, 2025 2:09 PM IST
देवस्थानांनी शेतीसाठी दिलेली जमीन विकत घेऊ शकतो का? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर