मुंबई : केंद्र सरकारने सोयाबीनच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ जाहीर केली असली, तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा कमी झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी हमीभावापेक्षा लक्षणीय प्रमाणात कमी बाजारभाव मिळाल्यामुळे आणि दरांमध्ये सातत्याने असलेल्या अस्थिरतेमुळे उत्पादकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. परिणामी, या खरीप हंगामात राज्यात सोयाबीनच्या लागवडीचे क्षेत्र सुमारे दोन लाख हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या हंगामात सरकारने सोयाबीनसाठी 4,892 रुपये प्रतिक्विटल हमीभाव जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना फक्त 3,800 ते 3,950 रुपये दर मिळाला. केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करण्याची संपूर्ण क्षमता नसल्याची माहिती व्यापाऱ्यांना असल्याने, बाजारात संगनमताने दर पाडले गेले, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना बसला.
या पार्श्वभूमीवर 2025-26 हंगामासाठी केंद्र सरकारने हमीभावात प्रतिक्विटल 436 रुपयांची वाढ करत तो 5,328 रुपये केला आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यात या निर्णयाला फारसा यश मिळालेले दिसत नाही.
मराठवाड्यात सोयाबीन हे मुख्य आर्थिक पीक मानले जाते, अगदी पश्चिम महाराष्ट्रासाठी ऊस जितका महत्त्वाचा आहे, तितकेच मराठवाड्यासाठी सोयाबीन. मात्र केंद्र सरकारच्या खाद्यतेल व सोयाबीन आयात-निर्यात धोरणातील अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारात हमीभावाचा आधार टिकत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनऐवजी इतर पिकांची लागवड करण्याचा विचार करत आहेत.
दरम्यान, राज्यातील खरीप हंगामाची व्यापक तयारी सुरू आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, या वर्षी एकूण 144.97 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आवश्यक बियाण्यांचा साठा 19.14 लाख क्विंटल इतका असताना, प्रत्यक्ष उपलब्ध बियाणे 25.08 लाख क्विंटल इतके आहे. त्याचप्रमाणे 46.82 लाख मेट्रिक टन खताची आवश्यकता असून, 25.57 लाख मेट्रिक टन खत सध्या उपलब्ध आहे.
मात्र एवढी तयारी असूनही बाजारभावातील अनिश्चितता शेतकऱ्यांच्या निर्णयावर परिणाम करत आहे. हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारभावातील मोठा फरक दूर होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची नाराजी संपण्याची शक्यता कमी आहे. या परिस्थितीचा राज्याच्या एकूण तेलबिया उत्पादनावरही परिणाम होणार आहे.
मागील हंगामातील पेरणी क्षेत्र: 51.36 लाख हेक्टर
चालू हंगामातील संभाव्य पेरणी क्षेत्र: 48.65 लाख हेक्टर
अंदाजित घट: सुमारे 2 लाख हेक्टर
नवीन हमीभाव (2025-26): 5,328 रुपये प्रतिक्विटल
मागील वर्षी प्रत्यक्ष मिळालेला बाजारभाव:3,800–3,950 रुपये प्रतिक्विटल
राज्यातील शेतकऱ्यांनी यंदा दरांच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनऐवजी कापूस, तूर किंवा अन्य पिकांकडे वळण्याचा कल दाखवला आहे. यावर सरकारने तातडीने उपाययोजना करून बाजारव्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Mumbai,Maharashtra
July 01, 2025 11:22 AM IST
सोयाबीनचे पीक नको रे बाबा! शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, लाखो हेक्टर क्षेत्र घटणार