Last Updated:
Agriculture News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शासनाने 2025-26 आर्थिक वर्षासाठी तब्बल 60 कोटी 35 लाख रुपयांचा निधी कृषी आयुक्तालयाकडे वर्ग केला आहे.
मुंबई : राज्यातील अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शासनाने 2025-26 आर्थिक वर्षासाठी तब्बल 60 कोटी 35 लाख रुपयांचा निधी कृषी आयुक्तालयाकडे वर्ग केला आहे. या निर्णयामुळे मागील वर्षभरापासून प्रलंबित असलेले अनेक दावे आता मार्गी लागणार आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात, 2024-25 मध्ये, राज्यातील विविध तालुकास्तरीय समित्यांनी अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे एकूण 3050 प्रकरणे मंजूर केली होती. यामध्ये जवळपास 2978 मृत्यू प्रकरणांचा समावेश आहे, तर उर्वरित 72 प्रकरणे गंभीर अपंगत्वाशी संबंधित आहेत. या कुटुंबांना योजनेतून 2 लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव गमावलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
हा निधी मिळाल्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. अपघातात कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना नवजीवन मिळवण्यासाठी मदत होईल. शासनाने वेळेवर हा निधी वितरित केल्यामुळे अनेकांच्या मनातील अस्वस्थता दूर झाली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी ठरणार आहेत. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी शेकडो प्रस्ताव मंजूर झाले असून, लाखो रुपयांचा निधी जिल्हास्तरावर वितरित केला जाणार आहे.
या योजनेमुळे शेतकरी कुटुंबीयांना केवळ आर्थिक आधार मिळत नाही, तर शासनाच्या शेतकरीहिताच्या दृष्टीकोनाची जाणीवही होते.अपघातामुळे उध्वस्त झालेल्या संसाराला नवी दिशा देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी ठरत आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे आयुष्य सावरणार असून, अपघातग्रस्त कुटुंबांना योग्य त्या वेळी योग्य मदत मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न निश्चितच सकारात्मक आहे.
Mumbai,Maharashtra
June 16, 2025 11:17 AM IST
अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा! 60 कोटींचा निधी मंजूर, किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर