Last Updated:
Green Chilli Prices: यंदा मिरचीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक निघत असून भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, धावडा, वाढोणा, विझोरा, मेहगाव, भोरखेडा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली आहे. आता ही उन्हाळी मिरची तोडणीला आली असून, शेतकरी मजुरांसह घरच्या घरीच तोडणी करीत आहेत. यंदा मिरचीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक निघत असून भावही चांगला मिळत आहे. यात काळी मिरची 100, तर ज्वेलरी जातीची मिरची 80 रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
भोकरदन तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मिरचीवर कोकडासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांना औषधी फवारणी करावी लागली आहे. आता आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतली आहेत. एवढेच नव्हे, तर मिरची उत्पादक शेतकरीदेखील मिरचीचा तोडा तोडून बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. सध्या बाजारात आवक कमी असल्यामुळे भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहेत. महिनाभरात आवक वाढणार असल्याने भावातही घट होणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
सध्या बाजारपेठेत आवक कमी आहे. परिणामी, भाव कमी अधिक आहेत, परंतु आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन अधिक झाल्यास आपोआप भाव कमी होतील, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.
100 प्रतिकिलो काळी जातीची मिरची विकली जात आहे. यंदा उत्पादन जास्त होत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मी चार एकरांत उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे. त्यासाठी मिरचीचा तोडा निघेपर्यंत सुमारे चार लाखांचा खर्च आला आहे. आतापर्यंत तिसऱ्यांदा मिरची तोडण्यात आली आहे. यंदा भाव चांगला असल्यामुळे आर्थिक नुकसान टळले आहे. त्यामुळे तिखट मिरची आमच्यासाठी गोड झाली असल्याचं शेतकरी यांनी सांगितले.
Jalna,Maharashtra
July 16, 2025 10:12 PM IST
Green Chilli Prices: हिरवी मिरची महागली, शेतकऱ्यांसाठी आले चांगले दिवस, किलोला मिळतोय एवढा दर, Video