भारत सरकारने 1985 मध्ये वारसा कर रद्द केला, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला वडिलांकडून, आजी-आजोबांकडून किंवा मृत्युपत्राद्वारे मालमत्ता मिळाली, तर त्या मिळकतीवर थेट कर लागणार नाही. 1853 पासून अस्तित्वात असलेल्या संपत्ती कर कायद्यानुसार पूर्वी मृत व्यक्तीच्या संपत्तीवर 85% पर्यंत कर आकारला जात असे, मात्र तो कायदा आता लागू नाही.
1961 च्या आयकर कायद्यानुसार, मृत व्यक्तीकडून वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता “उत्पन्न” म्हणून गणली जात नाही. त्यामुळे मालमत्ता मिळताना किंवा हस्तांतरणाच्या वेळी कोणताही कर लागू होत नाही. मात्र, जर ती मालमत्ता भाड्याने दिली, विकली, किंवा व्याज मिळवून उत्पन्न कमावले, तर ते उत्पन्न तुमच्या इतर उत्पन्नासोबत धरून कर आकारला जातो.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला वारसाहक्काने मिळालेले घर भाड्याने दिले असेल, तर त्या भाड्याचे उत्पन्न करपात्र ठरते. त्याचप्रमाणे, वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर तुम्हाला जर बँकेचे व्याज मिळत असेल, तर तेही कराच्या कक्षेत येते.
तुम्ही जर वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला Capital Gains Tax (भांडवली नफा कर) भरावा लागतो. या कराची गणना करताना मालमत्ता तुमच्याकडे केव्हा आली हे न पाहता, ती मूळ मालकाने कधी खरेदी केली याचा आधार घेतला जातो.
जर मालमत्ता विक्रीपूर्वी 2 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवली असेल, तर तो दीर्घकालीन भांडवली नफा (Long-Term Capital Gain) मानला जाईल आणि त्या नफ्यावर 20% दराने कर आकारला जाईल (Indexation लाभासह).
जर मालमत्ता 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवली असेल, तर तो अल्पकालीन भांडवली नफा (Short-Term Capital Gain) मानला जाईल आणि कर सामान्य दराने भरावा लागेल.
दरम्यान, वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता ही करमुक्त असली, तरी तिच्याशी निगडित व्यवहारांवर कर आकारला जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही मालमत्ता मिळाल्यानंतर तिचा विधिसंगत उपयोग, विक्री किंवा उत्पन्नाचा विचार करताना कर कायद्याच्या अटी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसे केल्यास भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळता येते.
Mumbai,Maharashtra
July 08, 2025 12:57 PM IST