Last Updated:
Mini Tractor Anudan Yojana : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची विशेष अनुदान योजना राबवली जात आहे.
नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची विशेष अनुदान योजना राबवली जात आहे. ही योजना कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टरसह कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर आणि ट्रेलरसारखी उपसाधने खरेदी करण्यासाठी 90 टक्के शासकीय अनुदान दिले जाते. या अनुदानाची कमाल मर्यादा 3 लाख 15 हजार रुपये इतकी आहे, तर संपूर्ण खरेदी खर्चाची मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
योजनेच्या अटी काय?
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक अटी ठेवण्यात आल्या आहेत. अर्जदार स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. विशेषतः गटाचे अध्यक्ष, सचिव व किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे बंधनकारक आहे. ही अट समाजघटकांच्या उद्दिष्टित सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरते.
अंतिम मुदत किती?
या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. इच्छुक गटांनी कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये गटाची नोंदणी प्रमाणपत्र, बँक खाते तपशील, सदस्य यादी, जातीचे दाखले आणि उद्दिष्ट वस्तूंच्या खर्चाचे विवरण यांचा समावेश होतो.
योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेत अधिकृत मार्गदर्शन मिळू शकते.
Nashik,Maharashtra
ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतंय 3.15 लाख रूपये, अर्ज करण्यासाठी प्रशासनाचे आवाहन