Last Updated:
पावसाळा जसा शेतीसाठी फायदेशीर असतो, तसाच तो गावरान कोंबडी पालनासाठी काही अशी आव्हानात्मक ठरतो.
बीड: पावसाळा जसा शेतीसाठी फायदेशीर असतो, तसाच तो गावरान कोंबडी पालनासाठी काही अशी आव्हानात्मक ठरतो. दमट हवामान, चिखल, दूषित पाणी आणि परजीवी यामुळे कोंबड्यांमध्ये सर्दी, खोकला, त्वचेचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. त्यामुळेच या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील गावरान कोंबडी पालन व्यवसायात अनुभवी असलेल्या विकास बिक्कड यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात.
कोंबड्यांचा निवारा नेहमी स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवावा. पावसाळ्यात चिखल साचल्यास संसर्ग वाढतो, त्यामुळे जमिनीवर भुसा, गवत किंवा कोरड्या पानांचा थर टाकावा. आठवड्यातून एकदा लिंबाच्या रसाने निवाऱ्याचे निर्जंतुकीकरण करावे. तसेच, पाण्याचे भांडे दररोज स्वच्छ करून उकळलेले अथवा फिल्टर केलेले पाणीच वापरावे. या पाण्यात तुळशीचा रस किंवा त्रिफळा चूर्ण घातल्यास त्याचा अतिरिक्त फायदा होतो.
आहारात घरगुती नैसर्गिक उपायांचा वापर केल्यास कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळद, लसूण, आले, तुळस हे घटक प्रतिकारशक्तीसाठी लाभदायक आहेत. आठवड्यातून एकदा तुपात परतलेली हळद आणि लसूण खाण्यात मिसळल्यास सर्दी–खोकल्याचा त्रास होत नाही. तसेच गूळ, लसूण आणि लिंबाचा रस मिसळून दिलेले पाणी शरीर शुद्ध ठेवण्यास मदत करते. अंगावर दर १५ दिवसांनी लिंबाच्या रसाचे पाणी फवारल्यास उवा आणि किडे होण्यापासून बचाव होतो.
विकास बिक्कड सांगतात की, मी पावसाळ्यात विशेष काळजी घेतो नियमित आहारात औषधी घटकांचा समावेश, निवाऱ्याची स्वच्छता आणि पाण्याची गुणवत्ता यावर भर देतो. त्यामुळे कोंबड्या तंदुरुस्त राहतात आणि कोणत्याही औषधाशिवाय त्यांचं उत्पादन चांगलं मिळतं. त्यांच्या या पद्धतीचा अवलंब करून अनेक स्थानिक शेतकरी आज यशस्वी कोंबडी पालन करत आहेत.
शेवटी, पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची घरगुती उपायांनी काळजी घेतल्यास केवळ आजार टाळता येत नाही, तर आरोग्यपूर्ण आणि फायदेशीर उत्पादनही साधता येते. रासायनिक औषधांपासून दूर राहून नैसर्गिक उपायांनी संरक्षण केल्यास कोंबड्यांचे आरोग्य सुधारते आणि व्यवसाय अधिक लाभदायक ठरतो.
Bid,Maharashtra
July 08, 2025 10:05 PM IST
पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना विविध आजारांचा धोका, घरगुती करा हे उपाय, आजार राहातील कायम दूर