या प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला असून, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान निरीक्षण केंद्रे उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. या निर्णयामुळे गावागावात स्थानिक हवामान माहिती थेट उपलब्ध होणार असून, कृषी क्षेत्रासह आपत्कालीन व्यवस्थापनालाही मोठा आधार मिळणार आहे.
या प्रणालीमधून हवामानावर आधारित विविध घटकांची सतत नोंद केली जाते. उदा. तापमान, पावसाचे प्रमाण, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा यांची माहिती डिजिटल सेन्सरच्या साहाय्याने गोळा होते. ही सर्व माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ती थेट सरकारच्या पोर्टलवर प्रसारित केली जाते. यामुळे शेतकरी, हवामान शास्त्रज्ञ, प्रशासन आणि संशोधन संस्था यांना तातडीने अचूक माहिती मिळू शकते.
आतापर्यंत महसूल मंडळ किंवा तालुका स्तरावर काही केंद्रे उभारण्यात आली होती. मात्र, त्या केंद्रांमधून मिळणारे अंदाज संपूर्ण परिसरासाठी समान मानले जात असले तरी प्रत्यक्षात गावागावातील हवामान परिस्थिती वेगळी असते. उदा. काही गावांत मुसळधार पाऊस होतो, तर शेजारील गाव कोरडे राहते. पाऊस, वारा, गारपीट यांचे स्वरूप पूर्णपणे स्थानिक असते. त्यामुळे प्रत्येक गावाची प्रत्यक्ष माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर केंद्रे उभारणे गरजेचे ठरते.
सध्याचे तापमान तसेच किमान आणि कमाल तापमान
विशिष्ट कालावधीतील पर्जन्यमान (पावसाचे प्रमाण)
सापेक्ष आर्द्रतेची पातळी
वाऱ्याचा वेग आणि दिशा
वायुभाराचे मोजमाप
ही माहिती वेळोवेळी पोर्टलवर अद्ययावत होत राहील. त्यामुळे हवामानावर आधारित कृषी सल्ला देणे, पिकविमा दावे सुलभ करणे, संभाव्य आपत्तींची पूर्व सूचना देणे आणि हवामानविषयक संशोधन करणे या सगळ्या क्षेत्रांना मदत होणार आहे.
या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्थानिक माहिती शेतकऱ्यांच्या हाती पोहोचणार असून, पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी व योग्य निर्णय घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू ही केंद्रे कार्यान्वित होणार आहेत.
Mumbai,Maharashtra
July 04, 2025 9:37 AM IST
सरकारचा गाव तिथे हवामान केंद्र प्रकल्प काय आहे? शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर