Last Updated:
Agriculture News : घरातील मालमत्ता वाटपाच्या संदर्भात अनेकदा वाद उद्भवतात. विशेषतः वडिलांनी आपल्या संपत्तीचा हक्क एका मुलाला देण्याचा निर्णय घेतला, तर दुसरा मुलगा आपला हक्क मागण्यासाठी दावा करू शकतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो.
मुंबई : घरातील मालमत्ता वाटपाच्या संदर्भात अनेकदा वाद उद्भवतात. विशेषतः वडिलांनी आपल्या संपत्तीचा हक्क एका मुलाला देण्याचा निर्णय घेतला, तर दुसरा मुलगा आपला हक्क मागण्यासाठी दावा करू शकतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो. या संदर्भातील नियम काय आहेत, यावर स्पष्ट माहिती असणे गरजेचे आहे.
प्रथम समजून घ्यायला हवे की मालमत्ता दोन प्रकारची असते. जसे की, स्वअर्जित संपत्ती आणि वंशपरंपरागत (पूर्वजांची) संपत्ती. जर वडिलांची मालमत्ता स्वअर्जित (self-acquired property) असेल – म्हणजे त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून संपत्ती खरेदी केली, बांधली किंवा निर्माण केली असेल, तर वडिलांना त्या मालमत्तेवर संपूर्ण हक्क असतो. अशा संपत्तीवर ते आपल्या इच्छेनुसार कुणालाही देणगी देऊ शकतात, मृत्यूपत्र करू शकतात किंवा हक्क हस्तांतरित करू शकतात. या प्रकरणात दुसऱ्या मुलाला आपोआप हक्क मिळत नाही.
वडिलांनी मृत्यूपत्र तयार करून संपत्ती एका मुलाला देण्याचा निर्णय घेतला, तर दुसरा मुलगा त्या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देऊ शकतो. मात्र, यासाठी काही स्पष्ट कारणे आवश्यक असतात. उदाहरणार्थ वडिलांवर दबाव आणला गेला, फसवणूक झाली, वडील मृत्यूपत्र तयार करताना मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हते किंवा ते खोटे आहे असे दाखवावे लागेल. केवळ “माझा वाटा मिळाला नाही” हे कारण मृत्यूपत्र रद्द करण्यासाठी पुरेसे ठरत नाही.
दुसरीकडे, जर मालमत्ता वडिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा वंशपरंपरागत मिळालेली असेल. म्हणजेच ती वंशपरंपरागत संपत्ती (ancestral property) असेल, तर परिस्थिती वेगळी असते. हिंदू कायद्यानुसार वंशपरंपरागत संपत्तीवर सर्व संततींचा समान हक्क असतो. त्या संपत्तीचा एकट्याच्या इच्छेनुसार संपूर्ण वाटा कोणाला देता येत नाही. त्यामुळे वडिलांनी वंशपरंपरागत मालमत्ता एका मुलाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला तर दुसऱ्या मुलाला न्यायालयात दावा करण्याचा पूर्ण हक्क असतो.
अशा परिस्थितीत दुसरा मुलगा वाटणीचा (partition) दावा दाखल करून आपला हिस्सा मागू शकतो. न्यायालय चौकशी करून कायद्याप्रमाणे योग्य वाटपाचा आदेश देऊ शकते. अनेकदा वडील संपत्ती जिवंतपणीही एका मुलाला देतात. स्वअर्जित मालमत्तेच्या बाबतीत यावर कोणताही कायदेशीर बंधनकारक अडथळा नसतो. मात्र, वंशपरंपरागत मालमत्तेत दुसऱ्या वारसाचा वाटा थेट नाकारता येत नाही.
कायद्याने प्रत्येक प्रकरणातील संपत्तीचा स्वरूप, वडिलांचे अधिकार आणि वारसांचा हक्क यावर निर्णय अवलंबून असतो. त्यामुळे वडिलांनी एखाद्या मुलाला संपूर्ण संपत्ती देण्याचा निर्णय घेतला, तर दुसऱ्या मुलाला आपला दावा सिध्द करण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयात सादर करावे लागतील.
तज्ज्ञांचे म्हणणे असते की, अशा प्रकरणांमध्ये वाद टाळण्यासाठी वडिलांनी मालमत्ता वाटपाबाबत स्पष्ट मृत्यूपत्र तयार करणे आणि ती नोंदणी करणेच सर्वात सुरक्षित उपाय आहे. त्यामुळे भविष्यात कायदेशीर गुंतागुंत कमी होते आणि वारसांना स्पष्टता मिळते.
Mumbai,Maharashtra
July 06, 2025 11:31 AM IST
वडिलांनी एकाच मुलाला संपत्ती देण्याचा निर्णय घेतला तर दुसरा मुलगा दावा करू शकतो का? नियम काय?