संघर्षातून निर्माण झालेला विश्वास
कुटुंबप्रमुख बाळासाहेब खैरनार यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. झोपडी जळून गेल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी पोस्टमन, खाऊ गाडी, वृत्तपत्र वितरण अशा विविध कामांतून जीवन चालवले. 1999 मध्ये स्वतः विहीर खोदून सिंचनाची व्यवस्था केली आणि त्यातून शेतीत नवे पर्व सुरू झाले.
देशी वांग्याचे स्वबांधित बीज
खैरनार कुटुंबाने देशी वांग्याच्या वाणाला जीवापाड जपले आहे. 25 वर्षांपासून ते स्वतःच वांग्याचे बीज तयार करतात. निवडक वांग्यांपासून बी घेतले जाते, रोपे गादीवाफ्यावर तयार होतात आणि 5×5 फुट अंतरावर लावली जातात. पॉली मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या साहाय्याने उत्पादनात सातत्य राखले जाते. 20 गुंठ्याच्या प्लॉटवरून दर सिजन 500 ते 600 क्रेट (प्रत्येकी 15 किलो) वांग्याचे उत्पादन घेतले जाते.
थेट ग्राहकांशी संवादातून वाढलेली विक्री
बाळासाहेब यांचे पुत्र युवराज आणि पुतणे सुनील यांनी आधुनिक शेतीत प्रवेश करून प्रतवारी, साठवणूक व थेट विक्रीच्या पद्धती आत्मसात केल्या.आठवडी बाजारात थेट ग्राहकांशी संवाद साधून विक्री सुरू केली. यामुळे मध्यस्थ टळले,दर्जा राखला गेला आणि उत्पन्नही वाढले.
हंगामानुसार उत्पादन व दर
सौंदाणे, उमराणे, चांदवडसारख्या बाजारांत त्यांची वांगी विकली जातात. पावसाळ्यात वांग्याचे दर 70 ते 100 रुपये किलोपर्यंत तर उन्हाळ्यात 30 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचतात. याशिवाय टोमॅटो, काकडी, मिरची, भेंडी, कोबी व कांदा यांचीही लागवड केली जाते. कांद्याची साठवणूक करून टप्प्याटप्प्याने विक्री केली जाते.
हवामान बदलाशी जुळवून घेतलेली शेती
2023 मध्ये ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’अंतर्गत शेडनेट हाऊस उभारून भेंडी, काकडी, मिरचीची आधुनिक शेती सुरू केली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा खूप उपयुक्त ठरली आहे.
एकत्र कुटुंब व आदर्श जीवनशैली
खैरनार कुटुंबाची यशोगाथा त्यांच्या एकत्रित कुटुंबपद्धतीवर आधारित आहे. वडील, चुलते, पत्नी, भावजया आणि भाऊ – सर्वच शेतीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी असतात. व्यसनमुक्तता, वारकरी संप्रदायाचे पालन, सामाजिक सहभाग आणि ग्रामपंचायतीतील सक्रियता यामुळे हे कुटुंब एक आदर्श ठरते. युवराज खैरनार यांनी उपसरपंच म्हणूनही काम पाहिले आहे.
दरम्यान, या यशामागे देशी वाणांचे संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, थेट विक्रीचा पर्याय, आणि सातत्याने दर्जेदार उत्पादन देण्याची बांधिलकी हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे. एकेकाळी अन्नधान्याच्या शोधात असलेले हे कुटुंब आज आधुनिक शेतीत नावलौकिक कमावत आहे आणि अनेक ग्रामीण शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहे.
Nashik,Maharashtra
काटेरी वाग्यांनी फुलवलं आयुष्य! शेतकऱ्याने तयार केला स्वत:चा ब्रॅण्ड, होतेय बक्कळ कमाई