Last Updated:
PM Kisan 20 th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत आहेत. जुलै महिना अर्ध्यावर आला असतानाही अद्याप या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत आहेत. जुलै महिना अर्ध्यावर आला असतानाही अद्याप या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा 18 जुलै या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील मोतिहारी येथे होणाऱ्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी मोतिहारीमध्ये एका भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात ते 7100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा करणार असून, यामध्ये रस्ते, महामार्ग, आयटी आणि रेल्वे संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच, पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 40,000 लाभार्थ्यांच्या खात्यात 162 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. काही लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घराच्या चाव्याही सुपूर्द केल्या जातील.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आशा आहे की या कार्यक्रमातच पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची घोषणा होईल आणि 2000 रुपयांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. मात्र, अद्याप पंतप्रधान कार्यालय किंवा कृषी मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सामान्यतः पीएम किसान योजनेचा हप्ता जाहीर होण्याच्या एक दिवस आधी त्याची अधिकृत घोषणा केली जाते. परंतु 17 जुलैपर्यंत अशी कोणतीही घोषणा झाली नाही, त्यामुळे यंदा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या वर्षीचा 17 वा हप्ता 18 जून रोजी आणि 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा झाला होता. मात्र यावर्षी एक महिना उलटूनही 20व्या हप्त्याबाबत स्पष्टता नाही.
सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की ई-केवायसी, शेतकरी आयडी अपडेट, आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने खालील कामे करणे आवश्यक आहे:
ई-केवायसी अपडेट ऑनलाइन किंवा CSC केंद्रावर जाऊन पूर्ण करा.
शेतकरी नोंदणी/आयडी तयार करा.
आधार आणि बँक खाती योजनेशी जोडलेली आहेत की नाही याची खातरजमा करा.
मोबाईल नंबर योग्य आहे की नाही हे तपासा.
पंतप्रधान किसान योजनेच्या नावाने अनेक स्कॅम होत आहेत. जर कोणीतरी फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्याचा दावा करत असेल किंवा बँक तपशील मागत असेल, तर त्यापासून सावध राहा. योजनेशी संबंधित अधिकृत माहिती pmkisan.gov.in या वेबसाइटवरून मिळवावी.
Mumbai,Maharashtra
July 17, 2025 10:38 AM IST