Last Updated:
PM Kisan Yojana : तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कोट्यवधी शेतकरी 20व्या हप्त्याच्या वाटेवर आहेत.
मुंबई : तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कोट्यवधी शेतकरी 20व्या हप्त्याच्या वाटेवर आहेत. हा हप्ता 1 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत वितरित केला जाऊ शकतो, मात्र अद्याप त्याची अचूक तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, सरकारने पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर काही आवश्यक आणि उपयुक्त बदल केले आहेत, जे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण
योजनेच्या लाभातून काही कारणांनी वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात विशेष नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. अशा शेतकऱ्यांना आता थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीद्वारे तक्रारी नोंदवता येणार असून ही माहिती तुम्ही घरी बसून ऑनलाइन मिळवू शकता.
ही आहे प्रक्रिया :
अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर लॉग इन करा.
‘Farmer Corner’ विभागात जाऊन ‘Search Your Point of Contact (POC)’ या पर्यायावर क्लिक करा.
तुमचे राज्य निवडा. यानंतर त्या राज्यातील नोडल अधिकाऱ्यांची माहिती स्क्रीनवर दिसेल.
जिल्हानिहाय माहिती मिळवण्यासाठी ‘Search District Nodal’ या पर्यायाचा वापर करा.
राज्य व जिल्हा निवडून ‘Search’ बटणावर क्लिक करा.
उदाहरणार्थ, तुम्हाला महाराष्ट्रातील माहिती हवी असल्यास ‘महाराष्ट्र’ निवडा आणि सोलापुरातील अधिकारी शोधायचे असल्यास ‘सोलापूर’ निवडा.
पीएम किसान योजना काय आहे?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, जी 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू झाली. योजनेचा उद्देश म्हणजे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. हे पैसे 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. 2 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येतो. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत होते.
Mumbai,Maharashtra