Last Updated:
Agriculture News : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
मुंबई : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 6,000 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये (दर 4 महिन्यांनी) वर्ग केली जाते.
20 वा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता
या योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले होते. त्यामुळे 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, 20 वा हप्ता जून महिन्याच्या दुसऱ्या भागात म्हणजेच 20 जूनच्या आसपास जमा होण्याची शक्यता आहे. देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकरी या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
लाभ मिळवण्यासाठी पूर्ण करा ही प्रक्रिया
20 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण केलेल्या असाव्यात. जसे की, ई-केवायसी (e-KYC) अपडेट, आधार क्रमांक खात्याशी संलग्न, जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करणे गरजेचे आहे. जर या प्रक्रिया पूर्ण नसतील, तर हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर लॉगिन करून आपली स्थिती तपासावी.
पीएम किसान योजना फेब्रुवारी 2019 पासून लागू करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, एकूण 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. जे शेतकरी पहिल्यापासून लाभार्थी आहेत, त्यांना 38,000 रुपयांपर्यंत लाभ मिळालेला आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेची प्रतीक्षा
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ लागू केली आहे. याअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त 6,000 रुपये वार्षिक दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 6 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी 7 व्या हप्त्याच्या वितरणाची वाट पाहत आहेत.
दोन्ही योजनांचा एकत्रित फायदा
पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे या योजनांचे अपडेट नियमितपणे तपासणे आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Mumbai,Maharashtra
June 16, 2025 2:07 PM IST