मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पीक विमा योजनेत वाढलेल्या गैरप्रकारांमुळे आणि गैरवापरामुळे या नव्या सुधारणांचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनेक बाबींच्या आधारे विमा भरपाई मिळत होती, मात्र त्याचा लाभ प्रामाणिक शेतकऱ्यांऐवजी अनेक वेळा अपात्र लाभार्थ्यांना मिळत असल्याचे निरीक्षण आढळले.
नवीन सुधारणांनुसार, केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. याचा अर्थ, शेतकऱ्यांना फक्त प्रत्यक्ष उत्पादनाच्या घटावर आधारित नुकसान भरपाई मिळेल. जुन्या योजनेंतर्गत ज्या “ट्रीगर्स” (उदाहरणार्थ पेरणी न होणे, स्थानिक आपत्ती, इ.) मुळे शेतकऱ्यांना अधिक भरपाई मिळत होती, ते ट्रीगर्स योजनेतून काढून टाकण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी पूर्वी सुरू असलेली ‘1 रुपयात पीक विमा योजना’ही बंद करण्यात आली असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता खरिपासाठी 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के, आणि नगदी पिकांसाठी 5 टक्के प्रीमियम आकारला जाणार आहे.
राज्यात 2016 पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे. केंद्र शासनाने योजनेत केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादन या एका घटकावर भरपाई अनिवार्य केली आहे. मात्र राज्य शासनाने अतिरिक्त चार अॅड-ऑन कव्हरचा समावेश केला होता.त्यात प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल स्थिती, काढणी पश्चात नुकसान, आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश होता.
या अॅड-ऑन कव्हर्समुळे राज्य सरकारवर मोठा आर्थिक भार आला होता. विशेषतः हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीवर राज्याला 55 टक्क्यांहून अधिक भरपाई द्यावी लागत होती. या पार्श्वभूमीवरच सुधारित योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना काय फायदा होईल?
पारदर्शकता वाढेल – केवळ प्रत्यक्ष उत्पादनाच्या आकडेवारीवर आधारित भरपाई मिळाल्यामुळे गैरप्रकार आणि चुकीच्या दाव्यांना आळा बसेल.
योग्य लाभार्थ्यांनाच भरपाई – फसवणूक टाळून खरी नुकसानग्रस्त शेतकरीच भरपाईसाठी पात्र ठरेल.
शासनाचा आर्थिक भार कमी होऊन निधीचा योग्य वापर – राज्य सरकारचा अनावश्यक खर्च कमी होईल आणि अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे शक्य होईल.
पीक कापणी प्रयोगाचे प्रमाण आणि अचूकता वाढेल – अधिक जिल्ह्यांमध्ये अचूक सर्वेक्षण होणार असून, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा योग्य अंदाज घेता येईल.
Mumbai,Maharashtra
April 30, 2025 8:30 AM IST