Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रातील गावागावांत आता नकाशावरील रस्ते, शिव-पाणंद रस्ते, सहमतीने तयार झालेले रस्ते आणि विविध शासकीय विभागांनी विशिष्ट कामांसाठी तयार केलेले रस्ते यांची नोंद थेट गाव दप्तरी, म्हणजेच तलाठ्यांच्या नोंदींमध्ये केली जाणार आहे.
पुणे: महाराष्ट्रातील गावागावांत आता नकाशावरील रस्ते, शिव-पाणंद रस्ते, सहमतीने तयार झालेले रस्ते आणि विविध शासकीय विभागांनी विशिष्ट कामांसाठी तयार केलेले रस्ते यांची नोंद थेट गाव दप्तरी, म्हणजेच तलाठ्यांच्या नोंदींमध्ये केली जाणार आहे. हा एक मोठा बदल आहे, ज्यामुळे या रस्त्यांना कायदेशीर स्वरूप मिळणार आहे. या नोंदी सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कांखाली समाविष्ट केल्या जातील.
गेल्या अनेक वर्षांपासून गावांमध्ये रस्त्यांच्या वादांमुळे होणारे तंटे आणि तक्रारी सामान्य बाब होत्या. अनेक रस्ते प्रत्यक्षात वापरात असले तरी त्यांची अधिकृत नोंद नसल्याने कायदेशीर गुंतागुंत निर्माण होत असे. यावर तोडगा काढण्यासाठी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने सखोल अभ्यास करून राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला आहे.
या अहवालातील शिफारसींनुसार, आता राज्यभरातील सर्व गावांमध्ये अशा रस्त्यांची नोंदणी मोहिम स्वरूपात केली जाईल. यामुळे गावागावांतील रस्त्यांशी संबंधित वाद मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्येही अधिक स्पष्टता येईल.
या नव्या धोरणामुळे रस्त्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. याचा अर्थ असा की, यापुढे कोणत्याही रस्त्यावर अतिक्रमण करणे किंवा त्यांचा वापर करण्यास अडथळा निर्माण करणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे ठरेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. हा निधी केवळ दुरुस्तीसाठीच नाही, तर रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठीही वापरला जाऊ शकतो, यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद (शीर्ष) निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
ही मोहीम गावपातळीवर आणि तालुका पातळीवर राबवण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही समिती दर तीन महिन्यांनी गावागावातील रस्त्यांच्या नोंदींचा आढावा घेईल आणि त्यांची तपासणी करेल.
डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले की, सध्या राज्यात रस्त्यांच्या नोंदीसाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे अधिकारी आणि पद्धती वापरल्या जात होत्या. आता संपूर्ण राज्यात एकच पद्धतीचा अवलंब केला जाईल. यामुळे कामकाजात एकसूत्रता येईल. भूमिअभिलेख विभागानेही नकाशांवर या रस्त्यांच्या नोंदीसाठी स्वतंत्र पद्धत निश्चित केली आहे.
दरम्यान, हा बदल महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जमिनीच्या मालकी हक्कांशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण करेल आणि गावांच्या विकासाला गती देईल अशी अपेक्षा आहे.
Pune,Maharashtra
July 15, 2025 1:12 PM IST