Last Updated:
Agriculture News : गावाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. स्वतःचे हक्काचे घर. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्लॉट व घरांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
मुंबई : गावाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. स्वतःचे हक्काचे घर. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्लॉट व घरांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. अशा परिस्थितीत, महिलेच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीमुळे अनेक कुटुंबे हा पर्याय निवडत आहेत.
महिलांच्या नावावर खरेदी
महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. यातून महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्लॉट किंवा घर खरेदी करताना पत्नी, आई किंवा मुलीच्या नावाने खरेदी करण्याकडे लोकांचा कल झुकू लागला आहे.
काय फायदे होतात?
मुद्रांक शुल्कात विशेष सूट
घर किंवा जमीन खरेदी करताना सर्वसामान्य नागरिकांना मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावे लागते, जो घराच्या किमतीनुसार लाखोंमध्ये असतो. मात्र अनेक राज्यांमध्ये, जर मालमत्ता महिलेच्या नावावर खरेदी केली गेली, तर मुद्रांक शुल्कात 1 ते 2 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. यामुळे एकाच व्यवहारात लाखो रुपयांची बचत होऊ शकते.
गृहकर्जावर कमी व्याजदर
महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास, गृहकर्ज मिळवताना अनेक फायदे मिळतात. देशातील अनेक बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात. काही प्रकरणांत ही सवलत 0.10% ते 0.25% पर्यंतची असते, जी दीर्घकाळात मोठा फरक घडवते.
आर्थिक स्थैर्य व स्वावलंबन
महिलेच्या नावावर मालमत्ता असल्यास तिचा आर्थिक आत्मविश्वास वाढतो, आणि तिच्या भविष्याची सुरक्षितताही मजबूत होते. मालमत्ता तिच्या नावावर असल्याने कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढतो आणि समाजातील तिचे स्थानही बळकट होते.
Mumbai,Maharashtra
June 05, 2025 11:56 AM IST
पत्नी अन् मुलीच्या नावावर जमीन,घर खरेदी केल्यास काय फायदे होतात? वाचा सविस्तर