Last Updated:
Agriculture News : राज्यात मॉन्सूनने पुन्हा जोर धरला असून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुणे : राज्यात मॉन्सूनने पुन्हा जोर धरला असून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पावसाच्या वादळी वाऱ्यांनी कहर केला असून हातवळण गावात एका पोल्ट्री फार्मचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
80 लाखांचे नुकसान
हातवळण येथील पोल्ट्री व्यवसायिक शुभम गोगावले यांच्या पोल्ट्री शेडवर वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला. अचानक आलेल्या झंझावाती वाऱ्यामुळे शेडवरील पत्रे उडून गेले व भिंतीही कोसळल्या. यामुळे शेडमध्ये ठेवलेल्या 18,000 पेक्षा अधिक कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकट्या गोगावले यांचे अंदाजे 80 ते 85 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच तलाठी, तसेच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. कालपासून राज्यातील इतर भागांमध्येही मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, भात, भाजीपाला आणि फळबागांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कमी दाबाचा प्रभाव कायम, राज्यभरात पावसाची शक्यता
मराठवाडा आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
विदर्भात देखील काही ठिकाणी पावसाचे पूर्वानुमान व्यक्त करण्यात आले आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, पुणे, सातारा आणि कोकणातील घाट परिसरात मंगळवारी अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे.
Mumbai,Maharashtra
पाऊस आला अन् 80,00, 000 रुपयांचे नुकसान करून गेला! तरुणाची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी